सांगली प्रतिनिधी। तडीपारी आदेशाचा भंग करुन कोणत्याही अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता शहरात दाखल झालेल्या दोघा तडीपारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. बंड्या दडगे आणि महेश पाटील अशी त्यांची नावे आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी तडीपारी आदेशाचा भंग करुन शहरात आलेल्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तडीपारी आदेशाचा भंग केलेल्यांचा शोध सुरु केला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार केलेला पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार बंड्या आप्पासाहेब दडगे हा तडीपारी आदेशाचा भंग करुन हॉटेल शिवनेरीजवळ वावरत होता.
त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुसऱ्या घटनेत सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केलेला महेश आनंदराव पाटील हा तडीपारी आदेशाचा भंग करुन इस्लामपूर रोडवरील एस्सार पेट्रोलपंपाजवळ वावरत असताना आढळला. त्याला ताब्यात घेतले आहे. सदरच्या दोन्ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.