कोल्हापूर : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे काल रात्री उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लावलेल्या सापळ्यात 10 लाख 52 हजार 840 रुपयांचे गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. गोपाळ नामदेव सावंत, (रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) फिरोज अहमद शेख (रा. निमसालेवाडा, सावंतवाडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय मार्गावरुन बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतूक करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या फरारी पथकास मिळाली. विभागीय उप आयुक्त वाय.एम.पवार यांच्या आदेशाने आणि जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, उप अधीक्षक बापुसो चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने सापळा लावला. उजळाईवाडी येथे महिंद्र पिकअप वाहन कागलच्या दिशेने येत असल्याचे दिसले. हे वाहन पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला परंतु वाहन न थांबता शिरोलीच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले. भरारी पथकाने पाठलाग करुन सांगली फाटा येथे वाहन थांबविले.
आतमध्ये वाहनाची तपासणी केली असता रिकाम्या बाटल्यांच्या गोण्याखाली मॅकडॉल नं.1, रॉयल स्टॅग, रॉलय चॅलेंजर्स, विस्कीच्या 750 मि.ली क्षमतेचे 60 बॉक्स मिळून आले. बाजार भावानुसार त्याची 5 लाख 1 हजार 840 रुपये इतकी किमत असून गुन्ह्यात मिळून आलेले वाहन व इतर मुद्देमाल यांची किमत 5 लाख 51 हजार इतकी आहे. या कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, जय शिणगारे यांनी सहभाग घेतला.