साखर कारखानदारीमुळेच राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : साखर कारखानदारीमुळेच राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. शिक्षण,आरोग्य व मूलभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती घडून आली. त्यामुळे सध्या अडचणीत आलेला साखर उद्योग जगावा, वृद्धिंगत व्हावा व त्यायोगे ग्रामीण भागातील माझा शेतकरी सुखी-संपन्न व्हावा, यासाठी मी तत्परतेने प्रयत्न करेन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवारांनी व्यक्त केले. लोकसत्ता परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या साखर परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत साखर उद्योगाच्या समस्यांवर इत्थंभूत चर्चा घडून आली.

३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक साखर परिषदेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

या प्रसंगी शरद पवारांनी जागतिक साखर परिषदेविषयी माहीती दिली तसेच या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी माहिती देताना म्हंटले की, ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मी अध्यक्षस्थानी असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन व आंतरराष्ट्रीय साखर उद्योगासंदर्भात एक परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत जगातील २५ ते २८ देशांमधील तज्ज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.जागतिक स्तरावरील तज्ज्ञांकडून साखर उद्योगासंदर्भात तसेच उद्योगासंबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी आणि साखर उद्योगातील मंडळींनी या जागतिक परिषदेसाठी उपस्थित राहावे, अशी माझी सर्वांना विनंती आहे.

लोकसत्ता परिवारातर्फे घेण्यात येणाऱ्या या साखर परिषदेला मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी, साखर कारखानदार, संचालक, व्यवस्थापक व शासनाचे संबंधित अधिकारी यांनी या साखर परिषदेमध्ये सहभाग नोंदवून एक परिपूर्ण चर्चा घडवून आणण्यात मोठे योगदान दिले.