टीम, HELLO महाराष्ट्र |आयएनक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या अटकेपासून संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला असला तरी ईडीच्या अटकेपासून त्यांना उद्यापर्यंत (२७ ऑगस्ट) संरक्षण दिले आहे. दरम्यान, सीबीआयच्या विशेष कोर्टाने चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआयने तर आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात स्वतंत्र एफआयआर दाखल केल्या आहेत.
त्यामुळे या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी चिदंबरम यांनी सुरुवातीला दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळल्यानंतर चिदंबरम यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्यापूर्वीच त्यांना सीबीआयने अटक केल्याने त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणीस सोमवारी सुप्रीम कोर्टाने नकार दिला. आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआय बरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडी सुद्धा चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करु शकते.