मुंबई : होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच. हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारे शरद पवार एकमेव आहेत, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजाची उपमा तुम्ही एखाद्याला देत असता तेव्हा विचार करून बोलायला हवे, अशी टीका उदयराजेंनी पवारांवर केली होती. उदयराजेंच्या टीकेला आव्हाडांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडीओद्वारे हे प्रत्युत्तर दिले आहे.
…म्हणून शरद पवारांना जाणता राजा म्हणतात
आव्हाडांनी पवारांना जाणता राजा असे म्हणत असल्याचे जोरदार समर्थन केले. त्यांनी म्हंटले की, पाणी प्रश्न, शेती प्रश्न, औद्योगिक वसाहतींचे प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे शरद पवार यांच्याकडे आहेत म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. जसे काही जण त्यांची करंगळी पकडून राजकारणात आले आहेत तसे अनेक जण त्यांच्यावर टीका करून हेडलाईनमध्ये आले आहेत. महिलांना ३०% आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव, कोकण रेल्वे, जेएनपीटी अशी अनेक विकासाची कामे शरद पवारांनी केली आहेत. महाराष्ट्राच्या विकासात गेल्या ६० वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा असेल तर तो शरद पवारांचा आहे. म्हणूनच ते जाणते राजे आहेत.