हैद्राबाद | निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा नेहमीच तापू लागतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राम मंदिराच्या दृष्टीने सूचक विधान केले आहे. ‘२०१९ च्या निवडणुकी पूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरू झालेले असेल’ असे विधान करुन शहा यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.
तेलंगणा राज्याच्या भाजपा एककाची संघटनात्मक बैठक घेण्यासाठी अमित शहा काल हैदराबादमध्ये आले होते. ही बैठक तेलंगणाच्या राज्य पक्ष कार्यालयात पार पडल्याची माहिती भाजपचे नेते पी शेखर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मागील काही दिवसात आदित्यनाथ यांनी राम मंदिरा बाबत असेच एक विधान केले होते. “जे राम मंदिराला विरोध करत होते तेच आता राम मंदिराच्या बाजूने बोलू लागले आहेत’, यामागे मोठे षड्यंत्र शिजत आहे” असे म्हणुन “राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही” असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. येत्या काळात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राम मंदिर प्रश्न तापत जाण्याची शक्यता आहे.