औरंगाबाद – दिवाळीच्या सणामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती मंदावली होती. मात्र ‘हर घर दस्तक’ मोहिमेमुळे पुन्हा एकदा लसीकरचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी शहरात लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा पूर्ण झाला.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आठ नोव्हेंबरपासून हर घर दस्तक मोहीम सुर करण्यात आली. त्यात आशा स्वयंसेविकांमार्फत 23 हजार 15 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शुक्रवारी नऊ हजार 142 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात लसीचा एकही डोस न घेतलेले पाच हजार 558 स्त्रिया व पाच हजार 874 पुरुष आढळून आले. तसेच पहिला डोस घेतलेले 10 हजार पाच लाभार्थी व दुसरा डोस घेतलेले सात हजार 575 लाभार्थी आढळून आले.
दुसरा डोस न घेणारे 1404 स्त्री व 1320 पुरुष लाभार्थी यांना जवळच्या केंद्रावर लसीकरण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान 923 लाभार्थ्यांनी पहिला डोस व 426 लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला, त्यामुळे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 10 लाख एवढी झाली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
एकुण उद्दीष्ट – 10,55,600
पहिला डोस घेतलेल्यांची संख्या – 6,24,088
दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या – 3,81,552