मर्चंट नेव्हीत भरतीच्या आमिषाने युवकांची 10 लाखांची फसवणूक

0
52
Karad Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | मर्चंट नेव्हीमध्ये भरती करण्याचे अमिष दाखवून तीन युवकांची आठ ते दहा लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाणेतील दाम्पत्यासह सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी निलेश लालासाहेब शेवाळे (रा. शेवाळवाडी-म्हासोली, ता. कराड) याने याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे. त्यानुसार भिमराव चौगुले (रा. पणुंब्रे, ता. शिराळा, जि. सांगली), अमोल बाबा गोसावी व अनिता अमोल गोसावी (दोघेही रा. साकेत रेसिडेन्सी, डी. बी. चौक, कल्याण वेस्ट, ठाणे) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथील निलेश याची त्यांच्याच गावातील सेवानिवृत्त सैनिक दिनकर शेवाळे यांनी डिसेंबर 2018 मध्ये पणुंब्रेतील भिमराव चौगुले याच्याशी ओळख करुन दिली. भिमराव चौगुले हा युवकांना सैन्यदलात भरती करतो, असे त्यावेळी निलेशला सांगण्यात आले होते. चौगुले याने ठाणेतील अमोल गोसावी व त्याची पत्नी अनिता गोसावी यांच्याशी निलेशची ओळख करुन दिली. गोसावी दाम्पत्याचे वाशी-नवी मुंबई येथे कार्यालय होते. त्याठिकाणी जाऊन निलेशने त्याबाबत चर्चा केली. मर्चंट नेव्हीमध्ये भरती करतो, असे त्या दोघांनी सांगीतल्यानंतर निलेशने त्याचे मित्र शुभम मारूती पवार (रा. पिंपरी, ता. कोरेगाव) व प्रशांत विठ्ठल पाटील (रा. म्हासोली) यांनाही त्याबाबत सांगीतले. त्या दोघांनीही नेव्हीमध्ये भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार निलेश, शुभम व प्रशांतला चौगुले दाम्पत्याने प्रशिक्षणासाठी बोलवले.

तिघांना 5 जानेवारी ते 23 जानेवारी 2021 या कालावधीत प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर भरती होण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार तिघांनीही पैसे भरले. 29 जुलै 2019 रोजी या तिघांना दुबईला जाण्यासाठी विमानाचे तिकीटही पाठविण्यात आले. मात्र, दुबईला न पाठवता त्यांना 7 ते 8 महिने मुंबईतच रहायला लावले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमवारी निलेश शेवाळे याने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.