व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

होस्टेलमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी

कराड | तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख (रा.सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) याला दोषी धरून कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती होरे यांनी त्याला 10 वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी होस्टेलमध्ये असताना आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख हा तिला भेटण्यास गेला व तिला कास पठार येथे फिरविले. तेथे फिरून झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिडीत मुलीने लग्नानंतर जवळीक ठेवू असे सांगून त्यास नकार दिला. त्यानंतरही आरोपीने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली. याबाबत पिडीत मुलीने दि. 11 जुलै 2019 रोजी याबाबतची तक्रार कराड पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार संशयित आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख याच्यावर लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरूवातीला या गुन्हयाचा तपास तत्कालीन फौजदार चेतन मछले यांनी केला होता.

सदरचा खटला कराड येथील विशेष न्यायाधीश व जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. के. एस. होरे यांच्या न्यायालयात सुरू होता. सदर खटल्यात सरकार फिर्यादी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासले. विशेष व सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद व पिडीत मुलीचे आई, वडील यांचे साक्षी पुरावे व वैद्यकीय अहवाल, डॉक्टर यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी रणजित देशमुख याला दोषी धरून वेगवेगळ्या कलमान्वये पोक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरलेस तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून आर. सी. शहा यांनी काम पाहिले. तपासी अधिकारी म्हणून अमृता रजपूत यांनी काम पाहिले.