कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास घालून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन करून ही संस्था नावारुपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग आहे. त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 11 टक्के बोनस जाहीर करून या गळीत हंगामामध्ये दिलेली उद्दिष्टे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण केल्यास त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा युवा नेते यशराज देसाई यांनी केले.
दौलतनगर (ता.पाटण) याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 48 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.जयराज देसाई, शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष जयवंतराव शेलार, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम पाटील,माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण,ॲड.मिलिंद पाटील,गजानन जाधव,सोमनाथ खामकर,शशिकांत निकम,आनंदराव चव्हाण,अशोक डिगे,पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे, सौ.विश्रांती विजय जंबुरे,सौ.दिपाली पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते.
यशराज देसाई म्हणाले, केंद्र सरकारचे सहकारी साखर कारखानदारी आणि साखरे बाबतचे उदासीन धोरण आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची एफ.आर.पी. देण्यात अडचणी निर्माण झाल्या. सातारा जिल्ह्यात मोजक्याच कारखान्यांनी शंभर टक्के एफ.आर.पी. दिली आहे.यासंदर्भात देशातील सहकार क्षेत्रातील जाणते नेतृत्व असणारे आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा कारखान्यावर आर्थिक बोजा पडू नये यासाठी एफ.आर.पी.ची कारखान्यांनी तीन टप्प्यात द्यावी अशा सूचना केल्या आहेत.लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यानेही ९० टक्के एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. केवळ १० टक्के देणे बाकी आहे. मात्र ती ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही जमा केली जाईल, असे स्पष्ट केले.