नवज्योतसिंग सिद्धूचे सोनिया गांधीना पत्र; ‘या’ 13 मुद्द्यांवर दिला भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या चार पाणी पत्रात त्यांनी विविध मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. मागासवर्गीयांचा विकास, रोजगार, सिंगल विंडो सिस्टिम, महिला आणि तरुणांचे सबलीकरण, दारु आणि अवैध खाणकाम याविरोधात कारवाई यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.

सरकारमध्ये दलित समाजाचा आवाज बळकट करण्यासाठी एका दलिताला मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. पण असं असूनही त्यांना राज्यात समान स्थान मिळालेले नाही. प्रत्येक धार्माच्या समाजाच्या किमान एका सदस्याला चन्नी मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे. याशिवाय दोआबा क्षेत्रातून आणि मागास प्रवर्गातून दोन मंत्री बनवावेत, असं सिद्धू यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सिद्धू म्हणाले की, १७ वर्षे राजकीय सेवा केल्यानंतर आणि जनभावना समजून घेतल्यानंतर पंजाबच्या पुनरुज्जीवनासाठी ही शेवटची संधी आहे, असे त्यांना वाटत आहे. पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांना दिलेला १८ कलमी अजेंडा आजही महत्त्वाचा आहे. पंजाब हे बऱ्याच काळापासून देशातील सर्वात समृद्ध राज्य आहे. पण गेल्या २५ वर्षांच्या आर्थिक अनियमिततेमुळे पंजाब लाखो कोटींच्या कर्जामध्ये बुडाला आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये गेल्या महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूंनी राजीनामा दिला होता. आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले असून राजीनामा मागेही घेतला आहे.

You might also like