हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काल त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी आता 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी व 3 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती. या घटने प्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतही पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
शाईफेकीच्या घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात उमटले. या घटनेनंतर आठ पोलिस कर्मचारी आणि तीन अधिकारी निलंबित करण्यात आले असून शाईफेक प्रकरणात आता एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या दोन व्यक्तींसोबत हा पत्रकारही सहभागी झाला होता. ठरवून शाई फेकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
“महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. दरम्यान, सत्ता गेली त्यामुळं सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान सुरु असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काल पिंपरीत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.