परीविक्षाधीन तहसीलदारांचा दणका : माण तालुक्यात 11 स्टोन क्रशर सील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी | माण तालुक्यात ठिकठिकाणी वर्षानुवर्षे डोंगर पोखरून खडी, क्रश सँड, डबर अशा गौण खनिजची लूट करणार्‍या खाणसम्राटांना माणचे परीविक्षाधीन तहसीलदार रिचर्ड यानथन यांनी दणका दिला. विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असलेले 11 स्टोन क्रशर त्यांनी सील केले तसेच गौण खनिजची अनधिकृत वाहतूक करणारी वाहने जप्‍त केली.

माण तालुक्यात अनाधिकृत खाणी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर रिचर्ड यानथन हे महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांचा लवाजमा घेवून खाणीजवळ असलेल्या क्रशर साईटवर पोहोचले. त्यांनी अधिकृत परवान्याबाबत संबंधित क्रशर चालकांकडे विचारणा केली. त्यावर काही क्रशरचालकांनी क्रशर परवाना मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. सध्या तात्पुरते परवाने दिले आहेत का? याबाबत विचारणा केली असता असे कोणतेही परवाने नसल्याचे समोर आले. त्यामुळे यानथन यांनी संबंधित मंडलाधिकारी व तलाठ्यांना अनाधिकृत क्रशर सील करण्याचे आदेश दिले. घटनास्थळी असणारी वाहने जाग्यावरच जप्‍त करून हवा सोडण्या आली.

या कारवाईत परीविक्षाधीन तहसीलदार रिचर्ड यानथन मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार शैल्य वट्ट, महसूल सहाय्यक युवराज खाडे यांच्यासह गोंदवले, कुक्कुडवाड, मार्डी व म्हसवड सजातील मंडलाधिकारी व तलाठ्यांनी सहभाग घेतला. सील केलेल्या स्टोन क्रशरचा वीजपुरवठा बंद करण्याच्या सुचनाही महावितरणच्या उपअभियंत्यांना दिल्या आहेत.

कुठे- कुठे कारवाई

तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत गोंदवले येथील सुनीता कट्टे, दत्तू कट्टे व विवेक कट्टे, धुळदेव येथे बबन वीरकर, गोंदवले खुर्द येथे विनोद शेडगे व निवृत्ती फडतरे, धामणी येथे निलेश गायकवाड, इंजबाव येथे राजेंद्र फडतरे, जाशी येथे रणजित शिंदे, रांजणी येथे धनाजी दोलताडे व सुरेश भोसले यांच्या क्रशरचा समावेश आहे.

संबंधितांनी किती ब्रास खडी, डबर, क्रश सँड विकली? याची माहिती घेवून जप्‍त केलेला साठा याचा विचार करुन दंड केला जाणार आहे. चालू बाजारभावाच्या पाच पट प्रति ब्रास दंड आकारला जाणार आहे. तहसीलदारांनी केलेल्या या कारवाईमुळे खाणसम्राटांचेही धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment