हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाकडून आरक्षणाची तीव्र मागणी होत असताना देखील अद्याप सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील एका अकरावीत शिकणाऱ्या मुलाने स्वतःला पेटवून घेतले आहे. या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना ही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या घटनेबाबत संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेश गणेश जाधव असे संबंधित मुलाचे नाव असून त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. तो अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील रहिवासी आहे. आज सकाळी 7 वाजता सुरेश गणेश जाधवने घरात कोणी नसताना स्वतःला पेटवून घेतले. पुढे त्याला वाचवण्यासाठी गेल्यामुळे सुरेशच्या आई वडीलांना देखील गंभीर दुखापत झाली. यानंतर गावकऱ्यांना घडलेल्या घडण्याची माहिती मिळताच त्यांनी सुरेशला आणि त्याच्या आई-वडिलांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
परंतु सध्या सुरेश 60 टक्के भाजला गेल्यामुळे त्याचे प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, गेले 3 महिने होऊन गेले तरी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, म्हणून मी जळून घेतल्याचे सुरेशने सांगितले आहे. तसेच, या विधानाला दुजोरा देत “माझ्या मुलाच्या जीवाला काही झाले तर त्याला सरकार जबाबदार असेल” असे सुरेशच्या आईने म्हणले आहे.