औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीला महापालिकेस गतवर्षी प्रमाणे फटका बसला आहे. वर्षभरात केवळ २२.९९ टक्के वसुली झाली असून, १३६ कोटी ८२ लाख ७८ हजार ३०५ रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. कोरोना संसर्गामुळे गतवर्षी महापालिकेला कर वसुलीत मोठा फटका बसला होता. यंदाही दिवाळीपर्यंत परिस्थिती नाजूकच होती. दिवाळीच्यानंतर कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे पालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रीत करणे सुरू केले. कर वसुलीसाठी विविध पथके तयार करण्यात आली, त्यांनाही आता करवसुलीसाठी लक्ष्य देण्यात आले आहे.
कर मुल्यनिर्धारक व संकलक तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स तयार करण्यात आला. त्यामुळे डिसेंबरपासून करवसुलीने गती घेतली. पालिकेच्या पथकांनी काबी बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या. या कारवाईमुळे ३१ मार्चपर्यंत मालमत्ता करापोटी १०७ कोटी ७६ लाख ७० हजार रुपयांचा महसूल गोळा झाला. पाणीपट्टीपोटी २९ कोटी सहा लाख आठ हजार रुपये जमा झाले. मालमत्ता कर व पाणीपट्टी मिळून ३१ मार्चपर्यंत १३६ कोटी ८२ लाख ७८ हजार ३०५ रुपयांचा महसूल गोळा झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
२२.९९ टक्के वसुली
मालमत्ता करापोटी चालू वर्षाची मागणी व थकबाकी धरून ४६८ कोटी ५७ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. पण त्यापैकी १३६ कोटी ८२ लाख ७८ हजार ३०५ रुपयेच वसूल झाले आहे. वसुलीचे हे प्रमाण २२.९९ टक्के आहे. सर्वांत कमी वसुली (१३.६३ टक्के) झोन क्रमांक ३ची असून, सर्वाधिक वसुली (२७.६४ टक्के) झोन क्रमांक ५ ची आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp ग्रुप Join करा