हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडण्यात आल्याने गावातील दलित समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या सर्व घडामोडींमागे पालकमंत्री आणि भाजप नेते सुरेश खाडे यांचाच हात असून त्यांच्या आशीर्वादानेच प्रशासकीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोप दलित समाजाने केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्याय मिळवण्यासाठी बेडग गावातील शेकडो दलित कुटूंब गाव सोडून मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापूर्वी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान उभारण्यात आली होती. यासाठी गावच्या ग्रामपंचायत मुख्य सदस्यांनी देखील परवानगी दिली होती. परंतु 16 जून रोजी उभारण्यात आलेली कमान बेकायदेशीर असल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडून ही कमान काढण्यात आली. पुढे बेकायदेशीर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करत गावातील दलित समाजाने आंदोलन पुकारले. मात्र याची कोणीही दखल घेतली नाही किंवा कारवाई करण्यात आली नाही. तसेच प्रशासनाकडून गावातील सरपंच उमेश पाटील यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्यांना पाठीशी घालण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे गावातील दीडशे दलित कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे सर्व ग्रामस्थ मुंबईतील मंत्रालयाच्या बाहेर न्याय मागण्यासाठी उभे राहणार आहेत.
या सर्व प्रकरणानंतर गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीच्या अतिक्रमणाबाबत सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराचा खुलासा करावा असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच खुलासा समाधानकारक न ठरल्यास सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांना ग्रामपंचायत अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश निखिल ओसवाल यांनी दिले आहेत. हा खुलासा प्राप्त होताच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.