व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोकणात पावसाचे रौद्ररूप!! पूर सदृश्य स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातही कोकणी पट्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं आहे. कोकणातील रत्नागिरी चिपळूण रायगड, पालघर या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याकडून येत्या चार दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. यासंबंधीत प्रशासनाने देखील योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूण परिसरातील वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी कमालीने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आलेल्या आदेशानंतर चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तसेच नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या संबंधीत सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. चिपळूण भागात पावसाने चांगलाच जोर धरला असून हा जोर पुढील चार दिवस तसाच टिकून राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कोकणवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रायगड, पालघर जिल्ह्यात देखील हीच स्थिती निर्माण झाली आहे. रायगडमध्ये अंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदीचे पात्र भरून पाणी रस्त्यांवर वाहत आहे. यामुळे चांगलीच वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाली-खोपोली मार्ग बंद झाला आहे. कोकणात पूरस्थितीचे दृश्य निर्माण झाल्यामुळे प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात करण्यात आली आहे. तर चिपळूणमध्ये रात्रीच एनडीआरएफच पथक दाखल झाले आहे.