कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील घारेवाडी गावात तीन दिवसांत 16 रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव प्रशासनाने सोमवारी लॉक केले. तालुक्यात कोरोना बाधित कमी प्रमाणात असताना अचानक एकाच गावात एकाच दिवशी 12 रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने अन्य शंभर जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून सध्या सात दिवसांसाठी गाव लॉक असल्याची माहिती तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी दिली. .
घारेवाडी येथे बाधित रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. या घटनेने कराड तालुका हादरला आहे. विशेष म्हणजे शनिवारी व रविवारी घारेवाडीची यात्रा होती. त्यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी सोमवारी सकाळी खबरदारीचा उपाय म्हणून घारेवाडी पूर्ण करण्याचे आदेश काढले. आरोग्य विभागाने तातडीने बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाने घारेवाडी येथील अंतर्गत सर्व रस्ते बंद केले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. दूध विक्रेता व किराणा दुकानदार यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवस नमुने तपासणीची मोहिम घारेवाडीत राबवली जाणार आहे. दरम्यान सोमवारी आलेल्या अहवालामध्ये कराड तालुक्यात घारेवाडी 12, येरवळे 1, उंब्रज 1, कोरेगांव 1, विद्यानगर 2 आणि शहरात 1 असे 18 जण बाधित आले आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा