पंतप्रधानांची प्रमुख गुंतवणूकदारांसोबत बैठक, देशातील गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी मागवल्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रमुख खासगी इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल कंपन्यांच्या प्रमुख प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. अधिकृत प्रसिद्धीनुसार, भारताला गुंतवणूकीचे आकर्षक ठिकाण बनवण्यासाठी या बैठकीत सूचना मागवण्यात आल्या. जास्त भांडवल आकर्षित करण्याच्या पावलांच्या व्यतिरिक्त, भारतात व्यवसाय करणे आणखी सुलभ करण्यासाठीच्या उपायांवर देखील चर्चा करण्यात आली. याशिवाय सुधारणांच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

प्रसिद्धीनुसार, पंतप्रधानांनी या बैठकीत गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या व्यावहारिक सूचनांचे कौतुक केले आणि या समस्या आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले. या बैठकीत मोदींनी सुधारणांच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. पीएम गतिशक्ती सारख्या योजनांची ओळख आणि अनावश्यक अनुपालन ओझे कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांवरही चर्चा झाली.

यापूर्वीही नोव्हेंबरमध्ये पंतप्रधानांनी 20 मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. गुंतवणूकदारांसोबतच्या या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या. 1 फेब्रुवारी 2022 रोजी त्या 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासाठी सरकारने संबंधित उद्योग आणि क्षेत्रांच्या प्रतिनिधींशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

2014 मध्ये सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारने अनेक सुधारणात्मक पावले उचलली आहेत. भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे देशातील मोठ्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.

Leave a Comment