नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तुंच्या श्रेणीत केल्यानं त्याला जीएसटीतून वगळण्यात यावं अथवा त्यांच्या जीएसटी कमी करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून होत आहे. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. सातत्यानं उपस्थित केल्या जात असलेल्या हॅण्ड सॅनिटायझरवरील मागणीवर अर्थ मंत्रालयानं अखेर भूमिका मांडली आहे.
सॅनिटायझरसह अँटी बॅक्टेरियल लिक्विडस, डेटॉल इत्यादींवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येईल. त्याचबरोबर हॅण्ड सॅनिटायझर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्स, पॅकिंग मटेरिअल्स आणि इतर सेवांवरही १८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. त्यामुळे सॅनिटायझर व याच प्रकारच्या इतर वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केल्यास स्थानिक उत्पादकांना नुकसान सोसावं लागेल. जीएसटीच्या कमी दरामुळे आयातीलाच मदत होईल, जे की आत्मनिर्भर भारत अभियान या धोरणाच्या विरोधी आहे, असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.
Various chemicals, packing materials & input services etc. used for manufacture of hand sanitisers also attract 18% GST. Reducing GST rate on sanitisers & other similar items would lead to an inverted duty structure & put domestic manufacturers at a disadvantage: Finance Ministry
— ANI (@ANI) July 15, 2020
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर हात धुणे वा सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून सातत्यानं दिल्या जात आहे. हातांचे निर्जतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर फायदेशीर असल्यानं सॅनिटायझरच्या मागणीत कमालीची वाढ झाली. मात्र, सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येत असून, तो कमी करण्याची मागणी वाढू लागली आहे.