नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहता भारत लवकरच ६ लाख कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गाठण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जरी केलेल्या माहितीनुसार, देशभरात मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण कोरोनाबाधितांमध्ये २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ३ लाख ४७ हजार ९७९ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात १७ हजार ४०० जणांना जीव गमावावा लागलेला आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. लॉकडाउन सुरू होण्याआधी ३ टक्क्यांवर असणारे प्रमाण आता ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. दिल्लीत हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त म्हणजे ६६ टक्के आहे. बरे झालेले रुग्ण व उपचाराधीन रुग्ण यांच्यातील फरकही विस्तारत असून तो आता १ लाख २० हजार आहे असं केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं आहे.
भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेली राज्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही आहेत. या ८ राज्यांमध्ये देशातील ८५.५ टक्के कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यातही महाराष्ट्रानंतर आता पुन्हा तमिळूनाडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात दिल्ली दुसऱ्या स्थानावर होती. तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या ८६ हजार २२४ झाली असून दिल्लीमध्ये एकूण रुग्णसंख्या ८५ हजार १६१ झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या ; मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”




