नवी दिल्ली । आजकाल लोकांना स्मार्टफोनचे असे व्यसन लागले आहे की ते सतत फोनलाच चिकटून असतात. अनेक वेळा लोकं खाणे-पिणे विसरून फोनवर बोलत बसतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकं त्यांचे फोन बाथरूममध्येही घेऊन जातात. केवळ प्रौढांनाच नव्हे तर मुलांनाही स्मार्टफोनवर गेम खेळण्याची वाईट सवय लागली आहे. मात्र तुम्ही कधी गोरिला माकडाला स्मार्टफोनचे व्यसन लागलेले पाहिले आहे का?
डेली स्टारच्या वृत्तानुसार, शिकागोच्या लिंकन पार्क प्राणीसंग्रहालयातील Amare नावाचा गोरिला आजकाल बराच चर्चेत आहे. 190 किलो वजनाच्या या गोरिलाला स्मार्टफोन पाहण्याची इतकी सवय लागली आहे की, एकदा फोनमध्ये शिरला की तो त्यातून लवकर बाहेरच येत नाही. कित्येकदा त्याच्या लक्षातच येत नाही की दुसरा गोरिला त्याच्यावर मागून हल्ला करायला येतो आहे. तेव्हापासून प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना त्याची खूप काळजी वाटू लागली असून ते त्याला या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
गोरिला लोकांच्या फोनमध्ये यूट्यूब पाहतो
आता प्रश्न असा पडतो की, या गोरिलाकडे फोन कुठून आला. वास्तविक, गोरिलाकडे फोन नाही. प्राणीसंग्रहालयाला भेट द्यायला येणारी लोकं त्यांच्या फोनची स्क्रीन गोरिलाच्या दिशेने वळवतात, या वेळी गोरिला स्क्रीन पाहून प्रतिक्रिया देतो. अशा प्रकारे आता सर्वजण त्याला फोन दाखवतात आणि तो उत्सुकतेने फोनकडे पाहतो. काचेच्या पिंजऱ्यात बंद असूनही त्याला फोनचे व्यसन लागले आहे. तो लोकांसोबत सेल्फी घेतो आणि त्यांच्या फोनवर यूट्यूब व्हिडिओही पाहतो.
फोनमुळे गोरिला त्याच्या साथीदारांपासून दूर गेला आहे
प्राणिसंग्रहालयातील कर्मचार्यांना भीती वाटते की, इतर गोरिला Amare ला त्रास देऊ शकतात आणि त्याच्यावर आक्रमकपणे हल्ला करू शकतात. प्राणीसंग्रहालयाचे संचालक स्टीफन रॉस यांनी म्हटले आहे की,” हा गोरिला फोनच्या स्क्रीनकडे पाहण्यात खूप व्यस्त राहत आहे आणि याची त्यांना काळजी वाटते आहे. त्याने आपल्या सहकारी गोरिलासोबत वेळ घालवला पाहिजे.” आता प्राणीसंग्रहालयातील लोकांनी यासाठी एक बफर झोन तयार केला आहे, जेणेकरून लोकं या गोरिलाच्या जवळ जाऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे, त्यांना गोरिलाला फोनपासून दूर ठेवायचे आहे आणि त्याच्या साथीदारांसोबत जास्त वेळ घालवायला लावायचा आहे.