भारतात गेल्या २४ तासात तब्बल १९ हजार ४५९ नवे कोरोना रुग्ण, रुग्ण संख्या साडे ५ लाखांच्या टप्प्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अजूनही अपेक्षित घट होताना दिसत नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १९ हजार ४५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोबाधितांची संख्या आता ५ लाख ४८ हजार ३१८ इतकी झाली आहे. यापैकी २ लाख १० हजार १२० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ३ लाख २१ हजार ७२३ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

समाधानाची बाब हीच की रविवारच्या तुलनेत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. देशात एकाच दिवसात १९,९०६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे भारत २० हजाराचा टप्पा ओलांडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, सुदैवाने गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या किंचित प्रमाणात का होईना पण घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सलग पाचव्या दिवशी १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली. १ जूनपासून ३ लाख ३८ हजार ३२४ रुग्णांची भर पडली आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेले राज्य आहे. रविवारी दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे ५४९३ नवे रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत राज्यात ८६,५७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ७०,६०७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आणि दिल्लीत सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाने नुकताच महाराष्ट्राचा दौराही केला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी, रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाऊ नका, पण मृत्यूदर नियंत्रणात ठेवा, असे डॉक्टरांना सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”