सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पोलिसांना गोपनिय बातमीदारामार्फत साताऱ्यातील राजवाडा परिसरात अवैध मटका जुगार चालु असल्याची बातमी मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध मटका छाप्यात जुगाराचे स्लिपबुक, पेन, कार्बन, रोख रक्कम असा एकुण 2 हजार 15 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अनिल पांडुरंग पवार (वय- 55 रा.106 व्यंकटपुरापेठ, सातारा), धनंजय चंद्रमणी अगाणे (रा. गणेश चौक, गोडोली, सातारा) यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पो. नि. पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करणेबाबतच्या सुचना दिल्या. सदर पथकाने माहीती प्राप्त करुन राजवाडा परिसरातील राजधानी टॉवर्सचे परिसरात अचानकपणे छापा टाकला असता एका जिन्याचे आडोशास एक इसम अवैध मटका जुगार चालवितांना मिळुन आला. त्याचेकडे अवैध मटका जुगाराचे स्लिपबुक, पेन, कार्बन, रोख रक्कम असा एकुण 2015/- रु.किं.चा जुगाराचा ऐवज मिळुन आला.
पोलीसांनी सदरचा मुद्देमाल जप्त करुन त्या इसमास ताब्यात घेतले व त्याचेकडे विचारपुस केली असता त्यामध्ये त्याचे आणखी एका साथीदाराचा सहभाग असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्या दोन्ही इसमांविरुदध पो.कॉ. सचिन महादेव पवार यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करणेत आला असुन कारवाई करणेत आली आहे. सदरची कारवाई पो. हेड. कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पो. ना. अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो.कॉ.सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली आहे.