हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यातच आता काँग्रेसचेही 22 आमदार फुटणार असं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकदा राजकीय भूकंप होतो का ? अशा चर्चाना उधाण आलं आहे.
औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना खैरे यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल. मात्र फडणवीस हे हुशार माणूस आहेत. त्यांनी सरकार पडेल म्हणून काँग्रेसचे २२ आमदार आधीच तयार करून ठेवले आहेत. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून त्यांनी हे केलं आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान खैरे यांच्या या दाव्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याना विचारलं असता त्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. उलट ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असा टोला नाना पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे. खैरे यांच्या विधानामुळे आता काँग्रेस-शिवसेना यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे.