वीस लाखाचा गंडा घालणार्‍यास अटक; कराड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड :-शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कराड शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्‍या एकास कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हरीदयाळ रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटीस 3, रूम नं 1109, 10 माळा, सुपर टेक, ओमीक्रॉन, गे्रटर नोएडा, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरातील युवकांना शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून हरीदयाळ गुप्ता याने कराडातील युवकांच्याकडून 19 लाख 87 हजार 500 रूपये रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यावर मागवून घेतली व ती रक्कम परत न देता पळून गेला होता. याबाबत त्याच्यावर कराड शहर पोलिसात फिर्याद दाखल होती.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शहर पोलीस ठाणेस दाखल असलेल्या ठकबाजी व फसवणुकीच्या गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस नाईक तानाजी शिंदे, प्रफुल्ल गाडे, मारूती लाटणे, विनोद माने यांनी ठकबाजी व फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माहिती गोळा केली. त्यामध्ये दिल्ली व नोएडा भागातून हरीदयाळ गुप्ता यास अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’