सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी एका 20 वर्षीय नर्सनं विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. हि तरुणी एका खाजगी रुग्णालयात परिसचारिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान मंगळवारी सायंकाळी तिने विषारी इंजेक्शन घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. या नर्सने प्रेमप्रकरणात ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमधून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल.
आत्महत्या करणाऱ्या 20 वर्षीय परिचारिकेचं नाव आम्रपाली सतीश कांबळे असं आहे. मंगळवारी सायंकाळी आम्रपालीनं विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना मिरजेतील मराठे मिल चाळ परिसरातील रमामाता आंबेडकर कॉलनीमध्ये घडली आहे. आम्रपालीनं विषारी इंजेक्शन घेतल्याची माहिती कुटुंबीयांना कळल्यानंतर, नातेवाईकांनी त्वरित तिला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
मृत आम्रपालीचे मागच्या काही दिवसांपासून आपल्या ओळखीच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची माहिती आम्रपालीच्या कुटुंबीयांना मिळाली होती. पण कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला होता.असं असूनही आम्रपालीनं मंगळवारी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केली आहे. सर्वकाही ठिक असताना आम्रपालीनं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.