औरंगाबाद – कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्यांना अनुदानसुद्धा दिले जात आहे. महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात तब्बल 200 चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 15 व्या वित्त आयोगातून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
वातावरणीय बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणार असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयांनी खरेदी करण्याची सूचना केली आहे. 15 व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून 85 टक्के निधी ई-वाहने, ई-चार्जिंग सेंटर यावर खर्च केला जाणार आहे.
मनपा प्रशासक पांडेय म्हणाले की, महापालिकेने स्मार्ट सिटी च्या सहकार्याने वातावरणीय बदलाचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाने पाच ई-वाहने खरेदी केली असून, पदाधिकाऱ्यांना साठी ई-वाहने खरेदी केली जातील त्या सोबतच ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात दोन ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारले जातील. महापालिकेच्या कार्यालयापासून त्याची सुरुवात केली जाईल सर्व सरकारी कार्यालयात ई-चार्जिंग सेंटर राहणार असून, पेट्रोल पंप, मॉल, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, व्यापारी संकुल या ठिकाणीही ई-चार्जिंग सेंटर केले जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. सध्या स्मार्ट सिटीच्या कार्यालयात चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. त्याचप्रमाणे मध्यवर्ती जकात नाका येथील पेट्रोल पंपावरही चार्जिंग ची सोय आहे. चार्जिंगचे दर काय असतील हे धोरण नंतर निश्चित केले जाणार आहे.