नवी दिल्ली । गेल्या काही आठवड्यांत भारतातील खाद्यतेलाच्या किंमतीत किंचित नरमाई दिसून आली आहे. मात्र, यादरम्यान, एक नवीन घटना समोर आली आहे, ज्यामुळे भारतातील खाद्यतेल आणि विशेष रिफाइंड तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकेल. आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसू शकेल. देशात नुकतेच पेट्रोल-डिझेल, दूध, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ होत असताना, खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढू शकतील.
त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती वाढू शकतील
तज्ज्ञांच्या मते, इंडोनेशियातील पाम तेलाच्या संकटामुळे भारतात खाद्यतेलामध्ये तेजी येऊ शकते. हे एक अतिशय वेगळ्या प्रकारचे संकट आहे, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या उत्पादक आणि निर्यात करणार्या देशांपैकी एक असलेल्या इंडोनेशियामध्ये पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा इतका मोठा आहे की, इंडोनेशियन सरकारला किंमत नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलावी लागली आहेत. यामध्ये किंमत नियंत्रण आणि निर्यातीशी संबंधित काही पायऱ्यांचा समावेश आहे.
एका वर्षात दर 57% वाढला
मार्च 2021 मध्ये इंडोनेशियामध्ये एक लिटर ब्रँडेड स्वयंपाकाच्या तेलाची किंमत 14,000 इंडोनेशियन रुपये होती. मार्च 2022 मध्ये हे वाढून 22,000 इंडोनेशियन झाले. अशाप्रकारे एका वर्षात देशातील खाद्यतेलाच्या दरात 57 टक्के वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी इंडोनेशियन सरकारने किरकोळ किंमतींसाठी कमाल मर्यादा निश्चित केली होती.
इंडोनेशियन सरकार कठोर निर्णय घेणार
देशांतर्गत पातळीवर किंमत नियंत्रणासोबतच सरकारने निर्यातदारांसाठीही नियम कडक केले गेले आहेत. सरकारने निर्यातदारांना देशांतर्गत बाजारात नियोजित शिपमेंटपैकी 20 टक्के विक्री करणे बंधनकारक केले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडोनेशियन सरकार पाम तेलाशी संबंधित टंचाई लक्षात घेऊन त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
भारतासाठी महत्त्वाचा अपडेट
भारत आपल्या गरजेच्या 60 टक्के खाद्यतेल इतर देशांकडून आयात करतो. त्याच वेळी, एकूण आयात केलेल्या खाद्यतेलामध्ये पाम तेलाचा वाटा 60 टक्के आहे. भारत मोठ्या प्रमाणात इंडोनेशियामधून तेल आयात करतो. अशा स्थितीत इंडोनेशियातील पामतेलाच्या तुटवड्याचा परिणाम लवकरच देशांतर्गत बाजारात दिसू शकेल.
जाणून घ्या किंमती किती वाढल्या ?
15 एप्रिल रोजी सूर्यफूल तेलाची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 184.58 रुपये होती जी 1 जानेवारी 2022 रोजी 161.71 रुपये प्रति किलो होती. सोयाबीन तेल 148.59 रुपयांवरून 162.13 रुपये किलो झाले आहे. पामतेल प्रतिकिलो 128.28 रुपयांवरून 151.59 रुपये किलो झाले आहे.