औरंगाबाद – वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या बावीसवर्षीय विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी दहा वाजता उघडकीस आली. वैष्णवी रमेश काकडे (वय 22 रा. धानोरा ता. सिल्लोड) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे.
वैष्णवी ही शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयात बीएससी डॉट रेडिओ थेरपीच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होती. वैष्णवीचे वडील शेतकरी आहेत. वैष्णवी ही कुटुंबातील थोरली मुलगी होती. तिची धाकटी बहीण साक्षी बीसीएचे शिक्षण घेते. तर धाकटा भाऊ सार्थक सध्या प्राथमिक शिक्षण घेत आहे. जुबली पार्क येथील तीन रूमच्या घरात वैष्णवीसोबत आणखी पाच मुली राहतात. यातील तीन मुली काही दिवसांपूर्वी गावी गेल्या होत्या. यामुळे वैष्णवी आणि दोन मैत्रिणी शुक्रवारी खोलीत होत्या. रात्री जेवण झाल्यानंतर वैष्णवीने मी फोनवर बोलते तुम्ही झोपा असे सांगितले. त्यामुळे दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या.
दरम्यान शनिवारी सकाळी दहा वाजता एक मैत्रीण उठली तेव्हा वैष्णवीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्याने तिने ही बाब इतर मैत्रिणींना सगितली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पप्पा सॉरी…
आत्महत्या करण्यापूर्वी वैष्णवीने तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात म्हटले आहे, ‘‘पप्पा सॉरी मी खूप चुकीचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपासून तुम्ही मला शिक्षणासाठी बाहेर पाठवले. तुम्ही माझ्या शिक्षणासाठी खूप पैसे खर्च केले. पण मी एकही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. माझ्यावर तुमचा खूप विश्वास होता, तो विश्वासच मोडला ना. त्यामुळे मी आता तुम्हाला सोडून जात आहे. अभ्यास आणि परीक्षेचा तणाव होता. पास होईल की नापास या चिंतेने झोप येत नव्हती. तुमचे स्वप्न सार्थक पूर्ण करेल. साक्षीचे लग्न करा, माझ्या लग्नासाठी जमवलेली रक्कम तिच्या लग्नाला खर्च करा.’’