हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. म्हणजेच दिवसाला जवळपास 70 मुली बेपत्ता होत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत बेपत्ता होणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत गृहविभागाने या संपूर्ण प्रकरणी विशेष तपास पथक कार्यरत करावे अशी मागणी केली आहे.
जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 5 हजार 610 मुली बेपत्ता झाल्या आहेत. मार्च महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाली आहे. गायब होणाऱ्या मुलींचे वय 18 ते 25 वर्ष आहे. प्रेम, लग्नाचे आमिष, नोकरी हे मुली बेपत्ता होत असल्याचे कारण असू शकते. मार्च महिन्यात पुण्यातून 2258, नाशिक मधून 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, नगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
राज्यातील २२०० मुली मार्चमध्ये बेपत्ता; गृहविभागाने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे.@Dev_Fadnavis @Maha_MahilaAyog@maharashtra_hmo @DGPMaharashtra pic.twitter.com/vr2QXqsXbX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2023
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबाबत सरकारने ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. दिवसेंदिवस मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. 2020 पासून यामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र दुर्दैवाने प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी यंत्रणा असंण आणि त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे असं चाकणकर यांनी म्हंटल. बेपत्ता मुलींचा शोध लवकर लागला नाही तर या मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढल्या जातात. महाराष्ट्रासाठी ही मोठी चिंतेची बाब असून गृहमंत्रालयाने यासाठी विशेष तपास पथक सुरु करावे आणि संबंधितांवर कारवाईच्या सूचना द्याव्यात अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.