हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बेस्ट उपक्रम सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता बेस्टमधील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत 123 कामगारांना सेवेत समाविष्ठ करून घेण्याबाबत ऑर्डर काढण्यात येतील, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील इतर ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल, असे आश्वासन बेस्ट महाव्यवस्थापकांकडून देण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात “कंत्राटी कामगारांचा कायमस्वरूपी बेस्ट उपक्रम सेवेत समावेश करावा” या मागणीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात उपोषण पुकारले होते. त्यावेळी या सर्व कामगारांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली होती. तसेच, “सर्व कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत समाविष्ट करण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ” असे आश्वासन दानवे यांनी दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी महापालिका मुख्यालयात दानवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त, प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांच्यासोबत बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये, बेस्ट उपक्रमातील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घेतले जाईल अशी ग्वाही महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांनी दानवेंना दिली आहे. त्याचबरोबर, या संबंधित एक ते दोन दिवसात ऑर्डर काढण्यात येईल, आणि उर्वरित कामगारांना इतर ठिकाणी समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन देखील दानवेंना देण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी घेतले जाईल.