सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयातील ए.आर.टी. सेंटरकडे एच. आय. व्ही. बाधीत रुग्णांसाठीचा आवश्यक औषधसाठा नसल्याने शेकडो रुग्णांची हेळसांड सुरु होती. शासनाच्या यंत्रणेकडून औषधे उपलब्ध होत नसल्याने औषधाविना रुग्णांचे अतोनात हाल सुरु होते. एच. आय. व्ही. बाधीत रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे आले आणि त्यांनी कुटुंबाच्या वतीने 3 लाख रुपये किमतीची औषधे जिल्हा रुग्णालयाला मोफत दिली. यामुळे एच. आय. व्ही. बाधीत रुग्णांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. जानेवारी 2022 पासून जिल्हा रुग्णालयातील ए.आर.टी. सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा असून जिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने एच.आय.व्ही. बाधीत रुग्ण वाऱ्यावर होते.
दरम्यान, याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांना समजली. त्यांनी तात्काळ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या निदर्शनास ही बाब आणली. एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांची हेळसांड थांबावी आणि त्यांना त्वरित औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्वतः कुटुंबाच्या वतीने 3 लाख रुपये किमतीची औषधे खरेदी करून ती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी ए.आर.टी. सेंटरचे प्रमुख तथा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर बक्षी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, डॉ. राजकुमार जगताप, डॉ. अरुंधती कदम, ए.आर.टी. सेंटरचे डॉ. पूनम लाहोटी, डॉ. जयंत देशपांडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, राजेश जोशी, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण ही मदत केली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो असून एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, असे म्हटले जाते. एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांसाठी औषधे फार महत्वाची आहेत. शासनस्तरावरून औषधे मिळत नसतील तर या रुग्णांची मोठी गैरसोय होणार. त्यामुळे या रुग्णांना कायमस्वरूपी औषधे कशी उपलब्ध होतील, यासाठीही आपण प्रयत्न करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.
बाबाराजे महाराष्ट्रातील पहिलेच आमदार
ए.आर.टी. सेंटरचे प्रमुख डॉ. बक्षी यांनी एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांचे हाल कथन केले. जिल्हा नियोजन मधून निधीही उपलब्ध झाला पण, औषधे मिळाली नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. आम्ही मरायचे का? असा संतप्त सवाल हे रुग्ण करत होते. अशा गंभीर परिस्थितीत आ. शिवेंद्रसिंहराजे धावून आले. एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांसाठी स्वखर्चाने औषधे उपलब्ध करून देणारे बाबाराजे हे महाराष्ट्रातील पहिलेच आमदार आहेत, असे सांगून डॉ. बक्षी यांनी रुग्णालयाच्या वतीने आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.