कराड | पंढरपूर (जि. सोलापूर) येथील सुशांत बिल्लारे याच्या खून प्रकरणी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी कराड येथे तपास करीत या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तीन संशयिताना अटक केली आहे. अभय पाटील त्याचा कामगार बळीवंत तसेच भाऊसो माने याचा चुलत भाऊ राहुल माने अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या खून प्रकरणात आणखी संशयिताचा सहभाग असल्याची माहिती डॉ. सोळंके यांनी दिली.
पंढरपूर येथील वीट भट्टी मुकादम सुशांत खिल्लारे याच्या खून प्रकरणी सहभाग असलेला पहिला संशयित भाऊसो माने याचा आंबोली घाटात खोल दरीत मृतदेह फेकण्याच्या नादात पडून मृत्यू झाला. तर दुसरा संशयित तुषार पवार याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर खून, अपहरण, पुरावे नष्ट करणे, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन अटक केली. त्याला सोबत घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सोळंके यांनी कराड येथे घटनास्थळी भेट देत तपास केला. यात सुशांत खिल्लारे याला भाऊसो माने याच्या फार्महाऊस मधील शेताकडील मोडक्या वाड्यात डांबून ठेवत सतत मारहाण केली जात होती. त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, खिल्लारे याला उचलून आणण्यापासून ते कोंडून ठेवणे, मारहाण करणे हे प्रकार भाऊसो माने व त्याच्या घरच्यांना माहिती नव्हते. बाहेरच्या बाहेर हे सगळे सुरू होते. घटनेच्या दिवशी संशयित भाऊसो माने, तुषार पवार यांच्यासोबत अन्य काहीजण देखील मारहाणीत सहभागी होते, अशी माहिती ताब्यात असलेला दुसरा संशयित तुषार पवार याने पोलिसांना दिली.
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तुषार पवार यांने दिलेल्या माहितीवरून आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात अभय पाटील, त्याचा कामगार बळीवंत व राहल माने या तिघांचा देखील खून प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यात आणखी काही मित्रांचादेखील समावेश असून त्यांचा शोध सुरु असल्याचे तपासी अधिकारी डॉ. सोळंके यांनी सांगितले. या सर्वानी सुशांत खिल्लारे याला लाथा बुक्क्यानी वेदम मारहाण केली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला असे तपासात पुढे आले आहे. या तीन संशयिताना न्यायालयात हजर केले जाणार असून याबाबत अधिक तपास उपविभाग पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके करीत आहेत.