मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील मालाड पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या एका तीस वर्षीय व्यावसायिकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या व्यावसायिकाने आत्महत्या करण्यापूर्वी 12 पानी सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये त्याने आपण कर्जाच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तसेच त्याने त्याच्याकडे कोणाचे किती कर्ज आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे. एवढ्या तरुण व्यावसायिकाने या पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सौरभ पितळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे. ते आपल्या पत्नी आणि मुलासह मालाड पश्चिम परिसरात राहत होते. मृत सौरभ यांचे बांगुरनगरमधील विजय इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये इंजिनीअरिंग वर्कशॉप आहे. पण कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे फारसं काम नव्हते. अशात कामासाठी घेतलेल्या 25 लाखांच्या कर्जाचा डोंगर त्यांच्यावर होता. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावामध्ये होते. याच तणावातून त्याने सोमवारी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
मृत सौरभ हे सोमवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यानंतर घरी आल्यानंतर सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. उडी मारल्याचा आवाज येताच सुरक्षारक्षकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सौरभ हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती मिळताच बांगुरनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सौरभ पितळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.