‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ‘या’ कारणांसाठी घराबाहेर जाता येणार; गृहमंत्र्यांनी केलं स्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्य सरकारने ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स जारी केलेल्या आहेत. त्यात सरत्या वर्षाला निरोप देत असताना व नवीन वर्षाचं स्वागत करत असताना कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहात करोना संकटाचे भान राहावे म्हणून राज्य सरकारने आधीच ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स जारी केलेल्या असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत आज काही महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे.

‘कोरोनाचे संकट आवासून उभे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने करा’ असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र, रात्री ११ नंतर हे सर्व बंद होणार आहे. याचा अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधने नसतील. परंतु, सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत, असे अनिल देशमुख यांनी नमूद केले.

जनतेने राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करतानाच मोठ्या शहरातील जी हिल स्टेशन आहेत तिथेही हेच निर्बंध पाळण्याच्या सूचना त्या-त्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत, असेही गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या नव्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या सूचना अत्यंत महत्त्वाच्या असून त्यात कोणतीही कुचराई होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

दरम्यान, नाताळ, थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महापालिका क्षेत्रांत येत्या ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर ३१ डिसेंबरसाठीही राज्य सरकारकडून विशेष गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने यात नागरिकांना अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबर रोजी दिवसा संचारबंदी नसेल असे त्यात स्पष्ट करण्यात आले असून अन्य सण व उत्सवांप्रमाणे नववर्षाचे स्वागतही यंदा घरीच साधेपणाने करावे. कुठेही गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडला जाऊ नये, असे बजावण्यात आले आहे. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारे, बागा, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता नवीन वर्ष साजरे करण्याचे आवाहन सरकारने केलं आहे.

सोशल डिस्टन्सिंग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे नमूद करताना त्यात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी या ठिकाणांचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे. फटाक्यांची आतषबाजी करण्यात करू नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही गाइडलाइन्समध्ये बजावण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment