पुणे | सातारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेत लागणार्या वस्तूंचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाल्याचे सांगून व्यावसायिकाला तब्बल 38 लाख 20 हजाराला गंडा घातला आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एकासह पुण्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल वसंत क्षीरसागर (वय- 38, रा. सातारा), गणेश यशवंत खिलारे (वय- 38), पल्लवी गणेश खिलारे (वय- 29, रा. काळेपडळ, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी व आरोपी अमोल क्षीरसागर यांचा ट्रेडिंग सप्लायचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या निमित्ताने दोघांचा परिचय झाला होता. क्षीरसागार याने आम्ही सातारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला लागणार्या वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम करतो. त्यात तुम्ही गुंतवणूक करा, त्यावर तुम्हाला चांगला परतावा देतो, असे सांगितले. फिर्यादीने सुरुवातीला 6 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक केली. अमोल क्षीरसागर याने याच संधीचा फायदा घेत मोठे कंत्राट मिळाल्याचे फिर्यादींना सांगितले. त्यानुसार त्याने फिर्यादी यांच्याकडून त्यांचे फर्मची कागदपत्रे घेतली. त्यांच्या फर्मच्या नावाने वर्क ऑर्डर काढू, असे सांगितले. फिर्यादींनी 3 ते 4 ऑर्डरमध्ये गुंतवणूक केली. मात्र, क्षीरसागर याने मिळालेली ऑर्डर ही तात्काळ पूर्ण करायची आहे, असे सांगितले. शिवाय माल पुण्यातून खरेदी करून तिकडे दिला तर त्याचा खर्च देखील वाढेल असे सांगितले.
तेव्हा काम सातार्यातील खिलारे यांच्या गणेश एन्टरप्रायझेसच्या नावाने पूर्ण करून घेऊ, असे सांगितले. त्या कामासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 38 लाख 20 हजार घेतले. खूप कालावधी लोटून देखील कोणतेच बिल मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी क्षीरसागर याच्याकडे तगादा लावला. त्यावेळी गणेश एन्टरप्रायझेस नावाच्या फर्मवरून त्यांना एक लाख रुपये आले. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी स्वतः सातारा जिल्हा परिषदेमधून बिल काढण्यासाठी पाठपुरावा केला असता, अशी कुठलीही ऑर्डर सातारा जि. प. मधून फिर्यादी यांना दिली नसल्याचे लक्षात आले. वारंवार पाठपुरावा करूनदेखील पैसे मिळत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी सर्व चौकशी करून हा गुन्हा दाखल केला आहे.