हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथे कुरिअरने आलेल्या 38 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. क्रांती चौक पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून डीटीडीसी कुरिअरवर छापा मारत 38 तलवारी जप्त केल्या. शहरात कुरिअरने तलवारी मागविण्याची ही तिसरी घटना आहे. दरम्यान, या घटनेमुळे औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद व जालना शहरात येणाऱ्या कुरियरच्या माध्यमातून तलवारीची तस्करी केली जात असल्याची माहिती क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉक्टर गणपत दराडे यांना मिळाली होती ही माहिती मिळताच पोलिसांनी खात्री करण्यासाठी संबंधित कुरियरची सकाळी पोलिसांनी झाडा झडती घेतली. पोलिसांना सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर कुरियर चालकाने दिले मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आलेले कुरियर तपासणी करण्याची परवानगी दिली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/860807185318100
या कुरियरची तपासणी केली असता वेगवेगळ्या आकाराची घातक अशी शस्त्रे दिसून आले. पोलिसांनी या तलवारीचे सर्व बॉक्स जप्त केले असून यामध्ये वेगवेगळ्या आकारमानाच्या तब्बल 38 तलवारी असल्याचे उघड झाले या तलवारी कुणी मागितल्या कशासाठी मागितल्या याबाबत पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली.
दरम्यान, या अगोदरही औरंगाबाद मध्ये सिटी चौक पोलीस ठाण्याची मोठी कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये तब्बल 50 ते 55 तलवारींची मोठी कारवाई करण्यात आली त्याही तलवारींची ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात आली होती.