कराड | चोरे (ता. कराड) हद्दीत रात्रगस्त घालणा-या उंब्रज पोलिसांनी शेतीपंपच्या मोटर चोरणाऱ्या चौघांना रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई गुरूवार दि. 11 रोजीच्या मध्यरात्री करण्यात आली आहे. न्यायालयाने संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात शुभम धनाजी चव्हाण (वय -19), ओमकार भाऊसो खवळे (वय – 21), आनंद भाऊसो खवळे (वय- 30, सर्व रा. चोरे ता. कराड), अमोल बबन बाबर (वय- 26, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, शाहुपुरी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी पोलिस कर्मचारी यांच्या सह गृहरक्षक दलाला सतर्क रात्रगस्त करण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान, एका अल्टो कारमध्ये संशयित चोरे भागात फिरत असल्याचीही माहिती रात्रगस्त घालणा-या पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने आल्टो कार क्रमांक (एम. एच. 04. बी.क्यु. 3647) ही संशयितरित्या फिरताना मिळुन आली. कारला थांबवुन तपासणी केली असता कारमध्ये 4 जण मिळून आले. यावेळी पोलिसांनी कारची तपासणी केली असता 45 हजार रुपये किंमतीची 12.05 एच. पी. ची सबमर्सिबल पाण्याची मोटार मिळून आली. पोलिसांनी चौकशी केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सदरची मोटार ही चोरे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विहीरीवरील चोरल्याची कबुली संशयितांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिपाई यास बोलावून पोलिसांनी खात्री केली असता मोटार पाणीपुरवठा विहीरीवरील असल्याचे सांगितले. तपास सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदे करत आहेत.