बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात; नितीन गडकरी यांचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री गडकरींनी बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली. “एखाद्याकडून आपला काम कसे करवून घ्यायचे यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात गेला हे फक्त त्यांनाच कळते. बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात, असे गडकरी यांनी म्हंटले.

नागपुरात आयोजित कार्यक्रमात मंत्री गडकरी म्हणाले, ‘ऑटो चालणारा एक सामान्य भाजप कार्यकर्ता आपल्या कर्तुत्वामुळे पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे. नागपूर जिल्ह्यात पक्षाला भक्कम करण्यात बावनकुळेंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबाची चिंता सोडून स्वतःला पक्षासाठी झोकून दिले. त्यांनी उर्जा विभागाचे मंत्री असताना राज्याच्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

पक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येकाकडे पक्षश्रेष्ठींचं लक्ष असते. त्यामुळे पुढे पुढे करणारे नेत्यांची दिशाभूल करु शकत नाही याची नोंद प्रामाणिक कार्यकर्त्याने घ्यावी. हार घेऊन येणारे आणि बॅनर लावणाऱ्यांना बघून तुम्ही विचलीत होऊ नका, असा सल्ला गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला.