Sunday, May 28, 2023

उद्योजक विवेक देशपांडे यांच्या विरोधात 420 दाखल

औरंगाबाद – रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक कंत्राटदार विवेक शंकरराव देशपांडे यांच्यासह चारजणांविरूद्ध बनावट लेटरहेड, शिक्के तयार करुन जमीन खरेदी केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विवेक देशपांडे यांच्यासह गजानन रामजी बोदडे, गणेश गुलाबराव धुरंधर आणि जयसिंग लक्ष्मण चव्हाण यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सविता निरंजन वानखेडे यांनी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. यामुळे औद्योगिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

या तक्रारीनुसार, प्रशिक वीट व चुना उत्पादक सहकारी संस्थेच्या करमाड शिवारातील एक एकर जमिनीचा या चौघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. प्रशिक वीट व चुना उत्पादक सहकारी संस्थेची नोंदणी 1993 साली झाली आहे. या संस्थेचे 11 सभासद असून, मृत ईश्वरदास विक्रम अभ्यंकर हे अध्यक्ष आहेत. सविता वानखेडे या सचिव आहेत. या संस्थेने 1994 साली रामनाथ उर्किडे यांच्याकडून करमाड शिवारातील गट नंबर 183 मध्ये एक एकर जमीन 60 हजार रुपयांत खरेदी केली होती. तेव्हापासून ही जागा संस्थेच्या ताब्यात आहे. संस्थेचे सभासद गणेश धुरंधर यांनी 4 ऑक्टोबर 2020 रोजी फिर्यादीचे पती रामदास अभ्यंकर यांना माहिती दिली की, संस्थेची जमीन गजानन बोदडे आणि विवेक देशपांडे यांनी संगनमताने हडपली आहे. तेव्हा फिर्यादी नागपुरात वास्तव्यास होते. ते औरंगाबादेत परतल्यानंतर संस्थेची जमीन धुरंधर, बोदडे यांनी संस्थेचे बनावट लेटरहेड, शिक्के तयार करुन विवेक देशपांडे यांना 30 सप्टेंबर 2020 रोजी विक्री केल्याचे कागदपत्रावरुन स्पष्ट झाले.

फिर्यादींनी संस्थेच्या सदस्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीला सभासद बोदडे आणि धुरंधर अनुपस्थित राहिले. बनावट लेटरहेडवर सूचक व अनुमोदक म्हणून नाव असलेले सभासद शैलेश गजभिये व रामराव धाकडे यांनी बैठकीत सांगितले की, त्यांना व्यवहाराची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्या कागदपत्रावर त्यांची नावे टाकून बनावट स्वाक्षरी करून ठराव मंजूर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे बनावट कागदपत्र करताना बोदडे अध्यक्ष तर धुरंधर सचिव बनले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.