कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातसह सातारा, जावली, महाबळेश्वर, पाटण येथे पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तर जिल्ह्यातील इतर भागातही पेरणीयोग्य पाऊस पडू लागला आहे. अनेक भागात पाणी वाढल्याने संपर्कहीन गावे झाली आहेत. मात्र, आज पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयना धरणात आज शुक्रवारी दि.15 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 47.05 टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत आहे. गेल्या 10 दिवसात 33 टीएमसी पाणीसाठा धरण क्षेत्रात वाढला आहे. तर सध्या 2100 क्युसेस पाण्याचा विसर्ग पायथा गृहातून सुरू आहे. धरणात सध्या 46 हजार 450 क्युसेस पाणी प्रतिसेंकद साचत आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 4.71 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना 107 मिमी, नवजा 59 मिमी आणि महाबळेश्वर 143 मिमी पडला आहे.
गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने कोयना धरणासह अनेक भागात समाधानकारक हजेरी लावली आहे. शेतीला उपयुक्त पाऊस पडत असल्याने शेतकरी पेरण्या अंतिम टप्यात करताना दिसून येत आहे. दुष्काळी भागातही शेतकऱ्यांना समाधान देणारा पाऊस पडत आहे. परंतु शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कराड तालुक्यात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.