हरिहरेश्वर बॅंकेच्या 38 कोटीच्या घोटाळ्यात 5 जणांना पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाई | येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या 37 कोटी 46 लाख 89 हजार 334 रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या 5 जणांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बँकेचे संस्थापक व मुख्य संशयित नंदकुमार खामकर यांना न्यायालयाने ताब्यात दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली.

हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक मोहन शिंदे करत आहेत. बँकेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक वाईत आले होते. त्यांनी रमेश ज्ञानेश्वर खामकर, अॅड. ललित सूर्यकांत खामकर, अॅड. अविनाश अशोक गाडे, तुषार सखाराम चक्के, अमोल खोतलांडे यांना अटक केली. त्यानंतर मुख्य संशयित नंदकुमार खामकर स्वतः दुपारी सातारा येथील न्यायालयात हजर झाले होते.

पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर स्वतः हजर झालेल्या नंदकुमार खामकर यांनाही न्यायालयाने पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच बँकेचे सरव्यवस्थापक रमेश दगडू जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Comment