सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील नटराज मंदिराचे बाहेर अज्ञात इसमांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून केलेल्या खुनाच्या गुन्हयातील मुळ सुत्रधारास मुंबई येथून अटक करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अभिजीत ऊर्फ भैया शिवाजी मोरे व सोमनाथ बंडू शिंदे (दोघे रा. वाई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने मानखुर्द मुंबई येथून गुन्ह्यातील मुळ सुत्रधार असलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या संवेदनशील गुन्ह्यात सर्व 5 आरोपींना पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी, दि. 2 जुलै रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास सातारा शहरातील नटराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोघांनी अर्जून मोहन यादव (वय २६, रा. वाई) या तरुणाचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. खूनानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे घटनास्थळी भेट दिली होती. या घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार केले. हे पथक आरोपींचा शोध घेत होते. या पथकाने 4 जुलै रोजी गुन्ह्यातील तीन अल्पवयीन संशयितांना अटक केली. पण, मुख्य सूत्रधार व पोलीस रेकॉर्डवरील आरोपी अभिजित उर्फ भैया शिवाजी मोरे आणि सोमनाथ बंडू शिंदे हे फरार होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अभिजित मोरे आणि सोमनाथ शिंदे हे मानखुर्द (मुंबई) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक गर्जे यांचे पथक मुंबईला गेले. त्याठिकाणी दोघांही आरोपींना ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. या खूनप्रकरणात एकूण पाचजणांना अटक झाली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहीत निकम, सचिन ससाणे आदींनी सहभाग घेतला.