कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या ब्लॅक लिस्ट यादीत समावेश आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी ब्लॅक लिस्ट यादी पाहून कारखान्यांना ऊस गाळपास देताना सावधानता बाळगावी, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी केले आहे.
साजिद मुल्ला म्हणाले, 2020-21 च्या गाळप हंगाममध्ये ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेला नाही अथवा एफआरपी देण्यास विलंब केला आहे. अशा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची यादी प्रसिद्ध केलीय. त्याबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आभार मानतो. महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी सुरुवातीला गाळप झालेल्या उसाचा ज्यादा दर दिला. परंतु, नंतर गाळप झालेल्या उसाची बिले वेळेत दिली नाहीत. काही कारखान्यांनी उसाची बिले बुडविली आहेत. त्यात दुर्देवाने काही खासदार, आमदारांच्या कारखान्यांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, खंडाळा तालुका साखर कारखाना म्हावशी, गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड चिमणगाव चालवणारे जरंडेश्वर शुगर, स्वराज इंडिया अग्रो लिमिटेड उपळवे, ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूज या पाच कारखान्यांचा समावेश आहे. त्या पाच साखर कारखान्यांचा साखर आयुक्तांनी ब्लॅक लिस्टमध्ये समावेश केलाय. शेतकऱ्यांनी या कारखान्यांना आपला ऊस गाळपास देताना सावधानता बाळगावी, असे आवाहनही मुल्लांनी केलंय.