हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरात आणि अन्य राज्यात गेल्यानंतर विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्रासाठी मोठी गुड न्यूज आहे. पुण्यात 5 हजार कोटींचा प्रकल्प येणार असून त्यामुळे 40 हजार रोजगार मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुण्यात बजाज फिनसर्व (Bajaj Finserv) कंपनी राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यातून 40 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. अलीकडच्या काळातील राज्यात झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे असं फडणवीस यांनी सांगितले. हळू हळू पुणे हे राज्यातील फायनान्स हब होणार आहे. फिनटेकचे देखील हब बनत आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. या करारामुळे मोठ्या प्रमाणात त्याला बूस्ट मिळणार आहे. त्यामुळे बजाज फिनसर्वचे मी या निमित्ताने अभिनंदन करतो असेही त्यांनी म्हंटल.
दरम्यान, राज्यातील चाईल्ड ट्रॅफिकिंगवरून विरोधक आक्रमक झाले आहेत याबाबत विचारलं असता चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या संदर्भात गृहखाते संवेदनशील आहे. मोठ्या प्रमाणात या संदर्भातल्या कारवाया आम्ही सातत्याने केलेल्या आहेत. आणि आपण जर बघितले तर चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या संदर्भात जेवढी कारवाई जेवढी महाराष्ट्रामध्ये झाली आहे, तेवढी इतर कुठेही झालेली नाही. महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत हे रोखण्याचे काम राज्य सरकार करत आहे असं फडणवीस यांनी म्हंटल.