सातारा | महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आमदारांना 50 कोटी तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना 700- 800 कोटीचा निधील जात होता. कोरेगाव मतदार संघात यापुढे राष्ट्रवादीचा आमदार असेल शिवसनेचा नाही, असे जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगत असल्याचा आरोप बंडखोर आ. महेश शिंदे यांनी केला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेले महेश शिंदें यांनी एक व्हिडीअो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर जहरी टीका केली आहे. तसेच कोरेगाव मतदार संघातील आ. महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांच्यातील वर्चस्वाची लढाई मांडली. यावेळी आपण आमदार असून शशिकांत शिंदे यांना जास्तीचा निधी मिळत असल्याची खंतही आ. महेश शिंदे यांनी बोलून दाखविली आहे.
आ. महेश शिंदे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना पक्ष संपविण्याचा घाट घातला आहे. आम्ही पराभव केलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये निधी दिला जात होता, हेचं माजी आमदार भविष्यात आमदार होणार अशा गर्जना राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून केल्या जात आहेत. तसेच, राष्ट्रवादीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत आम्हीं सर्व आमदारांनी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली; पण काहीच उपयोग झाला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना वाचविण्यासाठीच सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना ही रोखठोक भूमिका घेण्याची आग्रही मागणी केली. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आघाडी नको. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.