हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बसमध्ये प्रवास करत असताना अनेकजण मोठमोठ्या आवाजात व्हिडिओ बघत असतात. यामुळे गोंगाटाची परिस्थिती निर्माण होऊन अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मात्र आता इथून पुढे बसमध्ये हेडफोन न लावता व्हिडिओ पाहिल्यास 5 हजाराचा दंड होणार आहे तसेच 3 महिने जेलची हवाही खायला लागू शकते.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने प्रवाशांना मोबाईलवर हेडफोन न घालता व्हिडिओ पाहण्यास किंवा गाणी वाजवण्यास बंदी घातली आहे. यामागील कारण गोंगाट हेच आहे. अनेकजण गाणी ऐकताना दुसऱ्याचा विचार करत नाहीत आणि मोठ्या आवाजात व्हिडिओ लावतात. त्याचा परिणाम आणि नाहक त्रास सहप्रवाशाला होतो. हा ताप कमी करण्यासाठी आता बेस्ट प्रशासनाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
हा नियम न पाळणारा आणि मोठ्या आवाजात व्हिडिओ लावणारा प्रवासी पकडला गेल्यास त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 38 आणि 112 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर त्या प्रवाशाला 5,000 रुपये दंड किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे बेस्ट मधून प्रवास करताना हेडफोन लावूनच गाणे किंवा व्हिडिओ पाहावा लागणार आहे.