बेंगळुरू । दारूची दुकान सुरु झाल्यापासून गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सकाळपासूनच या दारू वेड्यांनी वाईन शॉपबाहेर लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. मात्र, अशाच एका तळीरामाला नियमबाह्य जास्तीचे मद्यविक्री करणाऱ्या बेंगळुरूतील एका मद्य विक्रेत्याविरोधात राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या विक्रेत्याने एका ग्राहकाला १३.५ लिटर दारू आणि ३५ लिटर बियर अशी एकूण ५२,८०० रुपयांची दारू विकल्याचा आरोप आहे. दारू खरेदी केल्याचे ५२,८४१ रुपयांचे बिल व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानंतर दारू खरेदीदार आणि दारू विक्रेता असे दोघेही आता अडचणीत आले आहेत.
बेंगळुरूत ५२,८४१ रुपयांची दारू विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परवागीपेक्षा अधिक दारूची विक्री केल्याबद्दल कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारने दारू विक्रेत्याला दिवसाला भारतीय बनावटीचे परदेशी दारू एका व्यक्तीला केवळ २.६ लिटर , तर १८ लिटर बियर विकण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणात दक्षिण बेंगळुरूतील तावरेकेरे येथे किरकोळ दारू विक्रेत्याने एका वेळेला एका ग्राहकाला १३.५ लिटर मद्य आणि ३५ लिटर बियर विकली. ज्या ग्राहकाने ही दारू खरेदी केली आणि आपले बिल सोशल मीडियावर पोस्ट केले तो ग्राहक मात्र अद्याप सापडलेला नाही. उत्पादन शुक्ल विभाग मद्य खरेगी करणाऱ्या ग्राहकावर देखील गुन्हा नोंदवू शकतात. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्ती दिवसाला २.६ लिटरहून अधिक मद्य बाळगू शकत नाही, असा नियम आहे.
दरम्यान, दारू विक्रेत्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ही दारूची खरेदी एका व्यक्तीने केलेली नसून एकूण ८ जणांनी ती केली आहे. मात्र, त्यांनी पेमेंट एकाच कार्डाद्वारे केले, असे दारू विक्रेत्याचे म्हणणे आहे. उत्पादन शुक्ल विभाग विक्रेत्याचे म्हणणे खरे आहे का याची तपासणी करणार आहेत. दारू विक्रेत्याने दिलेले बिल व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर दारू विक्रेते सरकारी नियम कसे धाब्यावर बसवतात याची जोरदार चर्चा सुरू झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”