कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे. भुवनेश्वरकडून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून 5 लाख 53 हजार रुपये किमतीचा तब्बल 55 किलो गांजा कल्याण आरपीएफने जप्त केला आहे. या तस्करी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सम्राट बाबुराव पात्रा, संजू अहमद गाजी आणि अजगर अली बहाद्दूर खान अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे गांजा जप्त
कल्याण आरपीएफच्या जवानांच्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधान व सतर्कतेमुळे एक्स्प्रेसमधून तब्बल 55 किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तीन जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण आरपीएफचे निरीक्षक भूपेंद्र सिंहच्या मार्गदर्शनाखाली सी जी रुपदे यांचे पथक बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईकडे येणाऱ्या भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनन्स सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगीत इगतपुरी ते कल्याण दरम्यान पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान तीन प्रवासी आपसात भांडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे आरपीएफच्या पथकाने विचारणा केली त्यातील एकाने सीट खाली असलेली बॅग आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला.

यानंतर या तिघांच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव पाहता त्यांच्यावर आरपीएफ जवानांना संशय आला. यानंतर आरपीएफ जवानांनी तिघांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलिसाच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे सुमारे 5 लाख 53 हजार 950 रुपये किमतीचा गांजा आढळला. यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांच्याकडील गांजा जप्त केला. कल्याण रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment